
लांजा - रत्नागिरी | JPN NEWS : लांजा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, या वास्तूसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यासोबतच विकास निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी दिले.
लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या पुनर्बांधणीचा भूमिपूजन सोहळा आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि सरचिटणीस डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे हे स्मारक भवन बाधित होऊन त्यावर निष्कासनाची कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून स्मारक भवन निष्कासनाच्या कारवाईतून वगळण्यात यश मिळवले. या प्रयत्नांना सुरुवातीला आमदार प्रमोद जठार आणि त्यानंतर तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सहकार्य केल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
आता या स्मारक भवनाची नव्याने आणि अधिक देखण्या स्वरूपात उभारणी करण्यात येणार आहे. समाजासाठी आदर्शवत अशी वास्तू निर्माण करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिली.
भूमिपूजन सोहळ्याला लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, ग्रामीण अध्यक्ष संतोष जाधव, नगरसेविका मधुरा लांजेकर, ग्रामीण सचिव सचिन जाधव, माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लांजा तालुक्यातील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लवू कांबळे, व्ही. के. इस्वलकर, रघुवीर खिनगिनकर, सत्यवान पावस्कर, महादेव जाधव, भिकाजी देवधेकर, अनिरुद्ध कांबळे, एस. एन. कांबळे, सिद्धार्थ देवधेकर, आर. बी. कांबळे, अनोज जाधव, शंकर पवार, हनुमंत कदम, प्रशांत कदम, मारुती जाधव, संतोष कांबळे, रमेश कांबळे, प्रकाश कांबळे, गौतम कांबळे, सुभाष पवार, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.
भूमिपूजन सोहळ्यामुळे लांजा तालुक्यातील बौद्ध समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मारक भवनाची पुनर्बांधणी पूर्ण झाल्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी ही वास्तू महत्त्वाची ठरणार आहे.


No comments:
Post a Comment