
मुंबई - JPN NEWS, दि. ४ ऑगस्ट २०२६ :
बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (बीएमसी मार्ड)ने ५ ऑगस्ट २०२६ पासून मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांतील नियमित बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध आणि निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे बीएमसी मार्डने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बीएमसी मार्डने स्पष्ट केले की, सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना ब्रिज कोर्सच्या माध्यमातून एमएमसी नोंदणी देणे हे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रस्थापित निकषांशी विसंगत असून त्यामुळे एमएमसी नोंदणी व्यवस्थेची विश्वासार्हता कमी होण्याची आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भीती आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय पद्धतींचा आदर असून, क्रॉसपॅथीला आणि व्यावसायिक व नियामक निकषांच्या शिथिलीकरणाला विरोध असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
संघटनेने शासनासमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी सुरू करू नये, निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने तातडीने चर्चा करावी आणि वैद्यकीय शिक्षणाचे तसेच रुग्ण सुरक्षेचे प्रस्थापित निकष कायम ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीएमसी मार्डने स्पष्ट केले की, ५ ऑगस्टपासून नियमित ओपीडी सेवा बंद राहणार असली तरी आपत्कालीन सेवा, कॅज्युअल्टी, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती विभाग आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि कायदेशीर तसेच लोकशाही मार्गाने पुढील टप्प्यातील आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बीएमसी मार्डने दिला आहे.


No comments:
Post a Comment