
मुंबई - JPN NEWS, दि. ४ ऑगस्ट :
महाराष्ट्र वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटनेने (एमएसआरडीए) बीएचएमएस-सीसीएमपी पात्रता असलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) मार्फत आधुनिक वैद्यकाचा सराव करण्यासाठी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या मुद्द्यावर संघटनेने सेंट्रल मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
एमएसआरडीएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हा विरोध कोणत्याही वैद्यकीय पद्धतीविरोधात नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या संरक्षणासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. आधुनिक वैद्यकाचा सराव केवळ राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) मान्यताप्राप्त सखोल वैद्यकीय शिक्षण आणि कठोर क्लिनिकल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांनीच करावा, अशी संघटनेची भूमिका आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी काळी फीत लावून शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदवावा, असे आवाहन एमएसआरडीएने केले आहे. तसेच, रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने सर्व संबंधित घटकांशी अर्थपूर्ण चर्चा करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
"रुग्णांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. वैज्ञानिक निकषांचे अवमूल्यन स्वीकारले जाणार नाही," अशी ठाम भूमिका एमएसआरडीएचे अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी मांडली आहे.
बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांच्या नोंदणीच्या प्रस्तावावरून राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेला वाद आणखी तीव्र होत असून, विविध डॉक्टर संघटना या प्रस्तावाविरोधात एकवटताना दिसत आहेत.


No comments:
Post a Comment