
मुंबई JPN NEWS -
बेस्ट उपक्रमाचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच शुक्रवारी (7 ऑगस्ट) दुपारी मुलुंड चेकनाक्यावर झालेल्या भीषण अपघातात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ५६ वर्षीय महिला सफाई कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेस्टच्या वर्धापनदिनीच घडलेल्या या अपघाताने शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जयश्री भानाजी परमार (वय ५६) या पालिकेच्या सफाई कर्मचारी होत्या. दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास नेरुळ बसस्थानकातून मुलुंड चेकनाक्याकडे येणारी सी-५१२/३५ मार्गावरील बेस्ट बस मुलुंड चेकनाक्यावरील सिग्नलजवळ थांबली होती. सिग्नल हिरवा होताच बस सुरू झाली. त्याचवेळी रस्ता ओलांडणाऱ्या जयश्री परमार यांचा बसच्या पुढील उजव्या बाजूला धक्का लागला. त्या रस्त्यावर पडताच बसचे उजव्या बाजूचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर बस वाहकाने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला अग्रवाल रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी बसचालक, वाहक आणि संबंधित बसला मुलुंड पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
बेस्टचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून, रस्ता सुरक्षा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


No comments:
Post a Comment