मुंबई अग्निशमन दलात अधिकाऱ्यांची तीव्र कमतरता; तातडीने पदभरती करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2026

मुंबई अग्निशमन दलात अधिकाऱ्यांची तीव्र कमतरता; तातडीने पदभरती करण्याची मागणी


मुंबई JPN NEWS -
मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांच्या गंभीर कमतरतेमुळे आपत्कालीन सेवा आणि अग्निसुरक्षा तपासण्यांवर परिणाम होत असल्याचा दावा करत 'बीएमसी एससी-एसटी-ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन' ने अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेचे सरचिटणीस डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन दिले आहे.

डॉ. बापेरकर यांनी सांगितले की, मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची शेवटची भरती २०१२ मध्ये झाली होती. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत नवीन अधिकारी भरती न झाल्याने अधिकारी संवर्गावर मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या सुमारे दोन कोटी लोकसंख्येच्या मुंबईसाठी दररोज केवळ ४० ते ४५ अधिकारी उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यरत अधिकाऱ्यांचे सरासरी वय सुमारे ४५ वर्षे असल्याने अत्यावश्यक सेवेत तरुण अधिकाऱ्यांचा अभाव जाणवत आहे. यामुळे 'महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम, २००६' अंतर्गत होणाऱ्या अग्निसुरक्षा तपासण्या आणि इमारत निरीक्षणाची कामेही प्रभावित झाली आहेत.

याशिवाय, महापालिका प्रशासनाने अलीकडेच 'सहाय्यक स्टेशन अधिकारी' संवर्गातील २१२ पदे रद्द केल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कारण देण्यात आले असले, तरी यापूर्वी २०१०, २०१२, २०१३, २०१७ आणि २०२४ मध्ये कर्मचारी भरती करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुंबईसारख्या महानगरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलात सर्व आवश्यक अधिकारी पदे तातडीने भरावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS