
मुंबई JPN NEWS -
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सेंट्रल मार्ड (महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना)च्या शिष्टमंडळाने गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे आणि मुख्य समन्वयक डॉ. विनायक शाह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला असला, तरी निवासी डॉक्टरांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. मागण्या मान्य झालेल्या नसून, त्या पूर्ण होईपर्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
बैठकीत निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मुद्दे संयमाने ऐकून घेतले आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सेंट्रल मार्डने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यावेळी मुख्यमंत्री यांच्यासमोर निवासी डॉक्टरांना आपली भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रामेश्वर नाईक यांचे सेंट्रल मार्डने आभार मानले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाचेही कौतुक करण्यात आले.
सेंट्रल मार्डने स्पष्ट केले की, मागण्या पूर्ण होईपर्यंत सरकारसोबत चर्चेचा मार्ग खुला ठेवत लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरूच राहील.


No comments:
Post a Comment