Ph.D. Fellowship मधील अन्यायकारक अटी रद्द करा; भीम आर्मीचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 August 2026

Ph.D. Fellowship मधील अन्यायकारक अटी रद्द करा; भीम आर्मीचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा


पुणे JPN NEWS | दि. ८ ऑगस्ट २०२६
BARTI, SARTHI, महाज्योती तसेच इतर महामंडळांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या Ph.D. Fellowship मध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या अटी अन्यायकारक असून त्या तात्काळ रद्द करून संशोधक विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने शनिवारी पुणे येथे BARTI प्रशासनाची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत Ph.D. संशोधक विद्यार्थ्यांचे नेतृत्व दीपक घोडेश्वर यांनी केले. फेलोशिपसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या अटी, संशोधक विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच प्रलंबित मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडण्यात आल्या.

Ph.D. Fellowship साठी विद्यार्थ्यांची संख्या १०० पर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, ३५ वर्षांची वयोमर्यादा हटवून पूर्वीप्रमाणे सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिपचा लाभ द्यावा, HRA आणि Contingency Grant बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन या सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच BARTI, SARTHI, महाज्योती आणि इतर महामंडळांमार्फत संशोधक विद्यार्थ्यांना मिळणारे सर्व लाभ पूर्ववत करावेत, अशा प्रमुख मागण्या शिष्टमंडळाने प्रशासनासमोर मांडल्या.

दरम्यान, ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. जयश्री पाटील यांनी BARTIच्या महासंचालकांसमोर संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

भीम आर्मी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनीही प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. संशोधक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करून अन्यायकारक अटी रद्द न केल्यास भीम आर्मीच्या वतीने राज्यभर तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या वेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते, ॲड. जयश्री पाटील, भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, ॲड. तोसिफ शेख, दादासाहेब शिंदे, संदीप शेलार, स्वाती गायकवाड, मुकेश गायकवाड, सावंत साहेब, सनी सोनकांबळे यांच्यासह भीम राज सेनेचे प्रमुख राजू थाठे आणि मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

संशोधक विद्यार्थ्यांचे संविधानिक व शैक्षणिक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संशोधक विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही संघटनेने व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS