
मुंबई JPN NEWS | ८ ऑगस्ट २०२६ -
शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वैद्यकीय सेवांचे शुल्क भरताना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच रुग्णालयात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रभावीपणे लागू करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले.
लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाच्या क्षमतावाढ प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी वर्मा लवंगारे यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपत्कालीन विभाग, विविध रुग्ण कक्ष, एमआयसीयू, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, मुख्य रुग्णालय इमारत टप्पा क्रमांक २-अ तसेच ऑन्कोलॉजी इमारतीतील कामांची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
एक्स-रे, एमआरआय, बाह्यरुग्ण विभागातील केस पेपर तसेच विविध वैद्यकीय सेवांचे शुल्क भरण्यासाठी सध्या रुग्ण व नातेवाईकांना रोख रक्कम द्यावी लागते. त्यामुळे पॉस मशीन उपलब्ध करून देण्याबरोबरच डिजिटल पेमेंटसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यामुळे रुग्णालयातील रांगा कमी होऊन नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालयातील कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीवरही प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच वेळेपूर्वी रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. महापालिका मुख्यालयात कर्मचारी उपस्थितीच्या निगराणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात असून, त्याच धर्तीवर रुग्णालयातही AIचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.
रुग्णालयात नागरिकांच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच परिसरात अडथळामुक्त पदपथ तयार करावेत. नागरिक, निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे विकसित करावीत, तसेच नियंत्रण कक्षात नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही निर्देश देण्यात आले.
रुग्णालयातील स्वच्छतेला प्राधान्य देताना कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट युनिफॉर्मची व्यवस्था करावी. तसेच रुग्णालय परिसरात मूषक व श्वानांचा उपद्रव होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (एफ उत्तर) अरुण क्षीरसागर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment