रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यावर CAGचा गंभीर ठपका; CSMTसह मुंबईतील चार स्थानकांवर ई-कोलाय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2026

रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यावर CAGचा गंभीर ठपका; CSMTसह मुंबईतील चार स्थानकांवर ई-कोलाय


मुंबई JPN NEWS - रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात CAGच्या अहवालातून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कल्याण, लोणावळा आणि भिवंडी रोड या स्थानकांवरील वॉटर कुलरच्या पाण्यात ई-कोलाय (E. coli) बॅक्टेरिया आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्थानकांवरील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

CAGने ‘Passenger Amenities and Sanitation’ या विषयावर केलेल्या कामगिरी लेखापरीक्षणात २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत देशातील ५१२ बिगर-उपनगरीय रेल्वे स्थानकांची पाहणी केली. या तपासणीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, मुताऱ्या, आसनव्यवस्था, पंखे, शेड आणि इतर मूलभूत प्रवासी सुविधांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याचे अहवालात नमूद आहे.

५९ स्थानकांवर पाण्याची तपासणीच नाही - 
पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही रेल्वेच्या व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. सहा रेल्वे झोनमधील ५९ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची बॅक्टेरियोलॉजिकल तपासणी करण्यात आली नसल्याचे CAGच्या पाहणीत आढळले. रेल्वे बोर्डाने पाण्याच्या गुणवत्तेसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे अहवालातून दिसून येते.

महाराष्ट्रातील CSMT, कल्याण, लोणावळा आणि भिवंडी रोड या स्थानकांवरील वॉटर कुलरच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई-कोलाय आढळल्याचे CAGने नमूद केले आहे. याशिवाय देशातील इतर काही स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांमध्येही दूषितपणाच्या नोंदी आढळल्या आहेत.

५६ स्थानकांवरील नळाच्या पाण्यात टोटल कोलिफॉर्म -
अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये नऊ रेल्वे झोनमधील ५६ स्थानकांवरील नळाच्या पाण्यात टोटल कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळले. त्यामुळे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, शुद्धीकरण आणि देखभालीच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

४५८ स्थानकांवर मूलभूत सुविधा अपुऱ्या - 
CAGच्या लेखापरीक्षणात केवळ पाण्याची गुणवत्ता नव्हे, तर प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची स्थितीही चिंताजनक असल्याचे समोर आले. तपासलेल्या ५१२ स्थानकांपैकी ४५८ स्थानकांवर, म्हणजेच सुमारे ८९ टक्के स्थानकांवर, एक किंवा अधिक मूलभूत प्रवासी सुविधा अपुऱ्या असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

यामध्ये पिण्याचे पाणी, आसनव्यवस्था, पंखे, शेड, स्वच्छतागृहे आणि प्रवाशांना आवश्यक माहिती देणारे फलक यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

तसेच २,०३५ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याचे नळ, ४०३ स्थानकांवर मुताऱ्या आणि २०१ स्थानकांवर शौचालयांची संख्या निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईतील प्रमुख स्थानकांचाही अहवालात उल्लेख - 
देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्येही प्रवासी सुविधांबाबत त्रुटी आढळल्याचे CAGने नमूद केले आहे. नवी दिल्ली, हावडा, सियालदह, मुंबई सेंट्रल आणि CSMT यांसारख्या प्रमुख स्थानकांचाही अहवालात उल्लेख आहे.

मुंबईसारख्या देशातील सर्वाधिक वर्दळीच्या शहरांपैकी एका शहरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत अशा नोंदी आढळल्याने प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा विषय अधिक गंभीर बनला आहे.

पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याची शिफारस - 
प्रवाशांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी CAGने रेल्वे मंत्रालयाला नियमित पाणी परीक्षण आणि कठोर देखरेख व्यवस्था मजबूत करण्याची शिफारस केली आहे. तसेच सर्व रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्यासाठी एकसमान गुणवत्ता प्रोटोकॉलची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकांवर दररोज हजारो प्रवासी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे पाण्याची नियमित तपासणी, वॉटर कुलरची स्वच्छता आणि देखभाल तसेच दूषित पाणी आढळल्यास तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे या अहवालामुळे अधोरेखित झाले आहे.

रेल्वेकडून तातडीच्या उपाययोजना -
CAGच्या अहवालानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, CRB-CEO आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेत सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी तातडीच्या सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.
- सुमारे २० हजार ठिकाणी ‘Tank to Tap’ जलशुद्धीकरण व निगराणी व्यवस्था उभारण्यात येणार.
- जुन्या पाण्याच्या टाक्या बदलण्यात येणार.
- पाण्याच्या स्रोत व आउटलेटवर नियमित गुणवत्ता तपासणी केली जाणार.
- पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता व देखभाल सुनिश्चित केली जाणार.
- या उपाययोजनांवर रेल्वे बोर्डाच्या स्तरावर थेट देखरेख ठेवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS