
मुंबई JPN NEWS - दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये सोमवारी (१७ ऑगस्ट) दुपारी आग लागल्याची घटना घडली. दुपारी २.०१ वाजता आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.
आग बेसमेंटमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिकल उपकरणे, रेकॉर्ड ठेवण्याच्या कॅबिन, भंगार साहित्य, कागदपत्रे आणि लाकडी पार्टिशन यामध्ये पसरली होती. सुमारे ७ ते ८ हजार चौरस फुटांच्या परिसरात आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली.
आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने दुपारी २.१० वाजता लेव्हल-१ घोषित केले. आग बेसमेंटपुरती मर्यादित ठेवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, घटनास्थळी आठ अग्निशमन बंबांसह विविध अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली आहेत.
आग विझवण्यासाठी दोन हाय-प्रेशर आणि तीन मोठ्या तसेच चार छोट्या होज लाईन्सचा वापर करण्यात आला. धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी स्मोक एक्स्ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला असून, इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून वायुवीजन करण्यात आले.
अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका -
आगीच्या धुरामुळे इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून १५ जणांना जिन्याच्या मार्गाने सुरक्षितपणे खाली आणण्यात आले. तसेच अन्य काही जणांची अँगस लॅडरच्या मदतीने सुटका करण्यात आली.
दरम्यान, ८ जणांनी इमारतीच्या गच्चीवर आश्रय घेतला होता. त्यांनाही TTLच्या मदतीने सुरक्षितपणे खाली आणण्यात आले.
आगीच्या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. मात्र, काही व्यक्ती बेपत्ता किंवा जखमी आहेत का, याबाबत पोलिस, आयकर विभागाचे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, BEST, १०८ रुग्णवाहिका आणि BMCचे संबंधित कर्मचारी तैनात असून आग पूर्णपणे विझवण्याचे काम सुरू आहे.


No comments:
Post a Comment