
मुंबई JPN NEWS - मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवासाविरोधात सुरू केलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी तब्बल १५.४६ लाख विनातिकीट, अनियमित किंवा अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईतून १२१.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गेल्या वर्षी याच कालावधीत १४.४२ लाख प्रकरणांमध्ये ८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा प्रकरणांच्या संख्येत ७ टक्क्यांहून अधिक, तर दंडाच्या रकमेत सुमारे ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
या कारवाईत मुंबई विभाग आघाडीवर असून, ७.४० लाख प्रकरणांतून ४९.५० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागात ३.०५ लाख प्रकरणांतून ३१.९९ कोटी, पुणे विभागात १.५७ लाख प्रकरणांतून १३.६२ कोटी, नागपूर विभागात १.८६ लाख प्रकरणांतून १३.७७ कोटी, सोलापूर विभागात ८१ हजार प्रकरणांतून ५ कोटी आणि मुख्यालयाच्या पथकांनी ७७ हजार प्रकरणांतून ७.४४ कोटी रुपये वसूल केले.
जुलैमध्ये २०.१० कोटींचा दंड -
जुलै २०२६ मध्ये २.६० लाख विनातिकीट अथवा वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २०.१० कोटी रुपयांचा दंड वसूल झाला. जुलै २०२५ मध्ये ३.०८ लाख प्रकरणांतून १६ कोटी रुपये वसूल झाले होते. त्यामुळे यंदाच्या जुलैमध्ये दंडाच्या रकमेत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून स्टेशन तपासणी, अॅम्बुश चेक, फोर्ट्रेस चेक, इंटेन्सिव्ह चेक आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. मेल, एक्स्प्रेस, प्रवासी तसेच मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्येही या मोहिमा सुरू आहेत.
दरम्यान, विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये केला आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.


No comments:
Post a Comment