
मुंबई JPN NEWS - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान आतापर्यंत राज्यातील ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० मतदारांचे (७७.९७ टक्के) गणना पत्रक भरून स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे. त्यामुळे अजूनही सुमारे २२ टक्के मतदारांच्या गणना प्रक्रियेबाबत कार्यवाही पूर्ण होणे बाकी आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मतदारांकडून गणना पत्रक भरून घेण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण होणार आहे. त्यानंतर मतदार यादीतील नोंदींच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान, एकूण १ कोटी ८७ लाख ५६ हजार २३१ मतदार (१९.१७ टक्के) हे ‘Uncollectable EF’ या वर्गवारीत नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित मतदार सापडत नसणे किंवा गैरहजर असणे, कायमस्वरूपी स्थलांतरित होणे, मृत्यू झालेला असणे, अन्यत्र नोंदणी झालेली असणे तसेच इतर कारणांचा समावेश आहे.
या वर्गवारीतील मतदारांच्या नावांची यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO) मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच संबंधित मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचे गणना पत्रक १७ ऑगस्टपर्यंत भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
आतापर्यंत एकूण ९ कोटी ५० लाख ५५ हजार ५९१ मतदारांबाबत (९७.१४ टक्के) कार्यवाही करण्यात आली असून, २७ लाख ९८ हजार ४५८ मतदारांबाबत (२.८६ टक्के) कार्यवाही अद्याप बाकी आहे.
राज्याच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत गणना पत्रक पूर्ण करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने संबंधित मतदारांनी आपली माहिती तपासून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment