
मुंबई JPN NEWS -
वांद्रे येथील ऐतिहासिक 'नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान' (Neville D'Souza Football Ground) याचे आरक्षण बदलून 'प्रदर्शन/संमेलन केंद्र' करण्याच्या प्रस्तावाला मुंबई काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
महापालिकेतील काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी स्थायी समिती सदस्य ट्युलिप मेरिंडा तसेच मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस उपस्थित होते.
अशरफ आझमी यांनी आरोप केला की, मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणे उद्योगपतींच्या हितासाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू असून, आता त्याची झळ वांद्र्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानालाही बसत आहे. तरुणांना खेळण्यासाठी मैदाने कमी असताना विद्यमान क्रीडांगणे संपवण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसच्या निवेदनानुसार, नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान हे मुंबईच्या फुटबॉल संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र असून, येथे सुमारे ४०० युवा क्लब, ३०० वरिष्ठ क्लब आणि दरवर्षी ८ ते १० हजार फुटबॉलपटू सराव करतात. त्यामुळे या मैदानाचे आरक्षण बदलणे म्हणजे मुंबईच्या क्रीडा वारशावर घाला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने महापालिकेला हा प्रस्ताव मागे घेण्याची आणि संबंधित प्रकल्पासाठी म्हाडाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच मुंबईतील मैदाने, उद्याने आणि सार्वजनिक जागांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment