
मुंबई / JPN NEWS -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडत, "जोपर्यंत देशात सामाजिक भेदभाव आणि विषमता कायम आहे, तोपर्यंत आरक्षणाची गरजही कायम राहील," असे स्पष्ट केले. मात्र, आरक्षणाचा लाभ घेऊन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्यांनी इतर गरजूंना संधी मिळावी म्हणून स्वेच्छेने आरक्षणाचा त्याग करण्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात आयोजित इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स (IIMUN) च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातून आलेल्या सुमारे दोन हजार जेन-झी आणि जेन-अल्फा तरुणांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.
शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण आता कमी करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता भागवत यांनी थेट हो किंवा नाही असे उत्तर देण्याचे टाळले. आरक्षणाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. सामाजिक अन्याय आणि विषमता संपेपर्यंत आरक्षण आवश्यकच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी त्यांनी आरक्षणाचा लाभ मिळालेल्या सक्षम घटकांनी औदार्य दाखवत इतर वंचित घटकांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने उप-वर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्देशांचाही त्यांनी उल्लेख करत, आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगितले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकारणावरही भागवत यांनी टीका केली. "आरक्षण ही सामाजिक एकता निर्माण करण्यासाठीची व्यवस्था आहे. मात्र त्याचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याने वाद निर्माण होत आहेत," असे ते म्हणाले. कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक विषमता कमी झाल्यास भविष्यात आरक्षणाची गरज आपोआप कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.


No comments:
Post a Comment