
मुंबई JPN NEWS | १० ऑगस्ट २०२६ -
मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदांची रिक्त असलेली ५६० पदे खात्यांतर्गत परीक्षा दिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांमधूनच भरावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे. अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी ही मागणी केली आहे.
महापालिकेतील खात्यांतर्गत निम्न संवर्गातील पदवीधारक व विहित अर्हता असलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यकारी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार १,१७८ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रत्येक विषयात ४० टक्के आणि एकूण ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक होते.
या परीक्षेत ४९१ उमेदवार उत्तीर्ण झाले. मात्र, प्रशासनाने गुणांची अट शिथिल करून ३२६ अनुत्तीर्ण उमेदवारांनाही कार्यकारी सहाय्यक पदावर नियुक्ती दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. एकूण १,१७८ पदांपैकी सुमारे ८०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्यानंतर ३७८ पदे तसेच संभाव्य १८२ पदे मिळून सुमारे ५६० पदे अद्याप रिक्त असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
उत्तीर्ण असूनही काही उमेदवार नियुक्तीपासून वंचित -
संघटनेने परीक्षा प्रक्रियेतील गुणांच्या निकषावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ४५ टक्के गुण मिळालेले, मात्र एक-दोन किंवा तीन विषयांत अनुत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. दुसरीकडे, सर्व विषयांत उत्तीर्ण होऊनही एकूण ४५ टक्के म्हणजे ९० गुणांची अट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेप्रमाणे महापालिकेने कार्यकारी सहाय्यक पदभरती केली असल्यास, शासन परिपत्रक क्र. साजेसू-३७२२/प्र.क्र.१७२/१४-अ, दिनांक १४ जून २०२३ यानुसार याच परीक्षेला सामोरे गेलेल्या पदवीधारक आणि विहित अर्हताधारी उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार करणे योग्य ठरेल, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
पुन्हा परीक्षा घेण्याऐवजी विद्यमान उमेदवारांमधून भरतीची मागणी -
महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक पदांसाठी निम्न संवर्गातील उमेदवारांना एकूण ३५ टक्के, तर मागासवर्गीय उमेदवारांना ३० टक्के उत्तीर्ण गुणांची अट असल्याचा दाखला संघटनेने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून उत्तीर्ण गुणांची अट पुन्हा शिथिल करावी आणि खात्यांतर्गत निम्न संवर्गातील पदवीधारक व विहित अर्हताधारी कर्मचाऱ्यांना कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदावर नियुक्ती द्यावी, अशी आग्रही मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.
नवीन भरती प्रक्रिया राबविल्यास होणारा विलंब आणि अतिरिक्त प्रशासकीय काम टाळण्यासाठी सध्या परीक्षा दिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांमधूनच रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.


No comments:
Post a Comment