
मुंबई JPN NEWS | १० ऑगस्ट २०२६ -
महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाला हरित आणि शाश्वत वाहतुकीची दिशा दाखवत आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगत, राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे वाहन उद्योग आणि वाहतूक क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
टाटा मोटर्सकडून ७ ते ५५ टन क्षमतेच्या भारतातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना सरनाईक यांनी इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे देशाच्या वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली.
पुण्यात भारतीय अभियंत्यांनी डिझाइन आणि विकसित केलेले हे इलेक्ट्रिक ट्रक ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनांचे उत्तम उदाहरण असल्याचे सरनाईक म्हणाले. भारतीय अभियंते, तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता यांची ताकद या वाहनांमधून दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
प्रदूषणासोबत इंधन खर्चातही बचत -
इलेक्ट्रिक ट्रकच्या वापरामुळे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच वाहतूकदारांचा इंधनावरील खर्च आणि एकूण ऑपरेटिंग खर्च कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहतूक व्यवसाय अधिक किफायतशीर, स्पर्धात्मक आणि पर्यावरणपूरक होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांनी २०७० पर्यंत भारतासाठी ‘नेट-झिरो’चे लक्ष्य निश्चित केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी वाहतूक क्षेत्राचे विद्युतीकरण महत्त्वाचे असून, इलेक्ट्रिक ट्रक हे त्या दिशेने निर्णायक पाऊल असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
३५० किमीपर्यंतची रेंज -
नव्या इलेक्ट्रिक ट्रकची एका चार्जमध्ये सुमारे ३५० किलोमीटरपर्यंतची रेंज असून, त्यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. कमी वेळेत चार्जिंग पूर्ण झाल्यामुळे वाहन अधिक वेळ रस्त्यावर धावू शकते आणि त्यामुळे वाहतूकदारांची उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते.
इलेक्ट्रिक ट्रक पर्यावरणपूरक असण्यासोबतच वाहतूकदार आणि चालकांसाठी अधिक फायदेशीर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पर्याय ठरणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
EV क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी -
महाराष्ट्राच्या EV धोरणासोबत केंद्र सरकारच्या PM E-DRIVE योजनेमुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना मिळत आहे. सरकार, वाहन उत्पादक आणि वाहतूकदार यांच्यातील भागीदारीमुळे इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा वापर देशात वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटीमुळे वाहन निर्मितीबरोबरच बॅटरी तंत्रज्ञान, संशोधन-विकास, उत्पादन, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि वाहन सेवा क्षेत्रात रोजगार व कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असेही सरनाईक यांनी सांगितले.
“आज आपण केवळ इलेक्ट्रिक ट्रकचे लॉन्चिंग करत नाही, तर स्वच्छ, आत्मनिर्भर आणि शाश्वत भारताच्या भविष्याचा मार्ग खुला करत आहोत. महाराष्ट्र या परिवर्तनात केवळ सहभागी राहणार नाही, तर त्याचे नेतृत्व करेल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.


No comments:
Post a Comment