‘OTP, पासवर्ड कुणालाही देऊ नका’; जामनेरच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा कानमंत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2026

‘OTP, पासवर्ड कुणालाही देऊ नका’; जामनेरच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा कानमंत्र

जामनेर JPN NEWS | १० ऑगस्ट २०२६ -
डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असताना ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे, यासाठी इंदिराबाई ललवाने ज्युनियर स्कूल, जामनेरपुरा येथे सायबर अवेअरनेस सेशनचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ‘OTP आणि पासवर्ड कुणालाही देऊ नका, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका’ असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

या सत्रात सायबर वॉरियर्स जान्हवी सपकाळे, वैष्णवी सैतवाल, साक्षी पाटील, विद्या सोनवने, राहुल चोपडे आणि जय ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फेक कॉल, बनावट लिंक, सोशल मीडिया फसवणूक, OTP फ्रॉड, बनावट वेबसाइट तसेच विविध ऑनलाइन आमिषांद्वारे होणाऱ्या फसवणुकीची उदाहरणांसह माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन -
सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती, OTP किंवा पासवर्ड देऊ नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवावे, असा सल्ला देण्यात आला.

संशयास्पद फोन, मेसेज किंवा ऑनलाइन घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीला त्याची माहिती द्यावी, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

सायबर अवेअरनेस बुकलेटचे वितरण -
यावेळी Quick Field Foundationच्या वतीने विद्यार्थ्यांना सायबर अवेअरनेस बुकलेटचे वितरण करण्यात आले. पुस्तिकेतील महत्त्वाची माहिती कशी समजून घ्यावी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी त्याचा उपयोग कसा करावा, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल जगात केलेली छोटीशी चूकदेखील मोठ्या आर्थिक किंवा वैयक्तिक नुकसानीचे कारण ठरू शकते. त्यामुळे ‘सावध राहा, सुरक्षित राहा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

प्राचार्य गायकवाड सर यांच्या सहकार्याने आणि आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनीही सायबर सुरक्षेबाबतची माहिती उत्सुकतेने जाणून घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS