मागण्या मान्य न झाल्यास ५ ऑगस्टपासून राज्यभर निवासी डॉक्टरांचा संप; सेंट्रल मार्डचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2026

मागण्या मान्य न झाल्यास ५ ऑगस्टपासून राज्यभर निवासी डॉक्टरांचा संप; सेंट्रल मार्डचा इशारा


मुंबई - JPN NEWS, दि. ३ ऑगस्ट २०२६ : 
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एमएमसी) सीसीएमपी प्रमाणपत्रधारक बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावासह निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ५ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सेंट्रल मार्डने जाहीर केला आहे.

सेंट्रल मार्डने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंतिम निवेदन सादर करून, मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी स्थगित ठेवावी तसेच निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अनेक बैठका आणि निवेदने देऊनही सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ५ ऑगस्टपासून राज्यभर लोकशाही मार्गाने नियमित वैद्यकीय सेवा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी संपाच्या पहिल्या २४ तासांत आपत्कालीन सेवा, कॅज्युअल्टी आणि सर्व जीवनावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सेंट्रल मार्डने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सरकारच्या प्रतिसादानुसार आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल.

रुग्णांची सुरक्षितता, वैज्ञानिक वैद्यकीय पद्धतींचे संरक्षण आणि निवासी डॉक्टरांच्या हितासाठी राज्य सरकारने तातडीने चर्चा सुरू करून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन सेंट्रल मार्डने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS