निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली; आजपासून नियमित आरोग्य सेवा बंद, फक्त आपत्कालीन सेवा सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2026

निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली; आजपासून नियमित आरोग्य सेवा बंद, फक्त आपत्कालीन सेवा सुरू


मुंबई - JPN NEWS, दि. ६ ऑगस्ट : 
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर राज्य सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सेंट्रल MARD महाराष्ट्रने राज्यव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीपासून राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी नियमित वैद्यकीय सेवा स्थगित करण्यास सुरुवात केली आहे.

आंदोलनामुळे नियमित बाह्यरुग्ण विभाग (OPD), नियमित आंतररुग्ण सेवा (IPD), वॉर्ड राऊंड, नियोजित शस्त्रक्रिया, नियोजित वैद्यकीय प्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम, सेंट्रल लॅबोरेटरी सेवा आणि फिव्हर OPD या सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

मात्र, रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सेंट्रल MARDने स्पष्ट केले आहे. यात अपघात व आपत्कालीन विभाग, ट्रॉमा केअर, अतिदक्षता विभाग (ICU), प्रसूतीगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया, जीवनरक्षक उपचार, इमर्जन्सी लॅब, रक्तपेढी तसेच तातडीच्या जीव वाचविणाऱ्या सर्व सेवा सुरू राहतील.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या KEM, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांतील BMC MARDनेही आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सेवा बंदची व्याप्ती वाढवली आहे. या चारही रुग्णालयांमध्ये OPD, नियोजित सेवा, सेंट्रल लॅबोरेटरी सेवा आणि वॉर्ड सेवा बंद ठेवण्यात आल्या असून केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत.

BMC MARDच्या अध्यक्षा डॉ. रुतुजा राऊत यांनी सांगितले की, चारही महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर संयुक्तपणे आंदोलनात सहभागी झाले असून सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

सेंट्रल MARDने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अनेक निवेदने, चर्चा आणि संवादाचे सर्व प्रयत्न करूनही सरकारकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सरकारने निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घेतल्यास सामान्य आरोग्य सेवा पूर्ववत सुरू करण्यास आम्ही तत्पर आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS