१० कोटी व्यसनमुक्ती शपथ अभियानाचा मुंबईत शुभारंभ; मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे जनआंदोलनाचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 August 2026

१० कोटी व्यसनमुक्ती शपथ अभियानाचा मुंबईत शुभारंभ; मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे जनआंदोलनाचे आवाहन


मुंबई - JPN NEWS, दि. ५ ऑगस्ट २०२६ : 
ब्रह्माकुमारीजच्या वतीने देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा अभियान’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या मुंबई अभियानाचा शुभारंभ आज वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (भायखळा प्राणिसंग्रहालय) येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाला.

राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री लोढा यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देणे ही काळाची गरज असून, केवळ शासन किंवा प्रशासन नव्हे तर सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांच्या सहभागातूनच हे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.

तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी लावून देश कमकुवत करण्याचे प्रयत्न होत असल्याचा उल्लेख करत, व्यसनमुक्ती ही राष्ट्रनिर्मितीची चळवळ असल्याचे लोढा यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पाचा उल्लेख करत त्यांनी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन केले.

६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत १० कोटी नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राजयोग ध्यान, शाळा-महाविद्यालयांतील जनजागृती, सामाजिक उपक्रम आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यसनमुक्त भारताचा संदेश देशभर पोहोचविण्यात येणार आहे.

शासनाने स्थापन केलेल्या व्यसनमुक्ती समित्यांमध्ये सामाजिक व आध्यात्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच ब्रह्माकुमारीजने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सातत्याने जनजागृती करावी. या कार्यासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही मंत्री लोढा यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS