
मुंबई JPN NEWS - ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३,००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम सुरू आहे. काल रात्रीपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, तांत्रिक अडचणींमुळे या कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
क्षतिग्रस्त दाबयुक्त जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, महानगरपालिका जल कार्य विभागाचे (नगरबाह्य) अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर तसेच पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल नागरिकांनी सहकार्य करावे, असेही महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.


No comments:
Post a Comment