
मुंबई JPN NEWS - पावसाळ्यात मुंबईत साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरू असताना, १५ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीत मलेरिया आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ, तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जून, जुलै आणि १५ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीची २०२५ आणि २०२६ या वर्षांची तुलना करण्यात आली आहे. यामध्ये डेंग्यूचे रुग्ण १,२२७ वरून १,०७९ झाले असून, रुग्णसंख्येत सुमारे १२ टक्क्यांची घट झाली आहे.
याउलट मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मलेरियाचे २,८५२ रुग्ण आढळले होते. यंदा ही संख्या ३,२९७ वर पोहोचली असून, मलेरियाच्या रुग्णांत सुमारे १५.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
स्वाइन फ्लू अर्थात H1N1च्या रुग्णसंख्येत यंदा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२५ मध्ये या कालावधीत ७२ रुग्ण आढळले होते. यंदा ही संख्या ३०९ झाली आहे. त्यामुळे H1N1च्या रुग्णसंख्येत तब्बल ३२९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
दरम्यान, चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी २७९ रुग्ण आढळले होते, तर यंदा ३३ रुग्णांची नोंद झाली आहे. लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण ३२२ वरून १८९ झाले आहेत.
गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही घट झाली असून, गेल्या वर्षीच्या २,२९४ रुग्णांच्या तुलनेत यंदा १,७५२ रुग्ण आढळले आहेत. कोविड-१९चे रुग्णही ६६८ वरून १२४ झाले आहेत.
पावसाळ्यात डासांची उत्पत्तीस्थळे वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेकडून डासांची उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करणे, घराघरांचे सर्वेक्षण आणि नागरिकांची आरोग्य तपासणी यासह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
विशेषतः मलेरिया आणि H1N1च्या वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आणि ताप किंवा अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
२०२५ च्या तुलनेत २०२६ मधील रुग्णसंख्या -
२०२५च्या तुलनेत २०२६मध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत १५.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मलेरियाचे रुग्ण २,८५२ वरून ३,२९७ झाले आहेत.
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत १२.१ टक्क्यांची घट झाली असून, गेल्या वर्षीच्या १,२२७ रुग्णांच्या तुलनेत यंदा १,०७९ रुग्ण आढळले आहेत.
चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत तब्बल ८८.२ टक्क्यांची घट झाली आहे. रुग्णसंख्या २७९ वरून ३३ वर आली आहे.
लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण ४१.३ टक्क्यांनी घटले असून, ३२२ वरून १८९ रुग्णांची नोंद झाली आहे.
गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत २३.६ टक्क्यांची घट झाली असून, रुग्णसंख्या २,२९४ वरून १,७५२ झाली आहे.
याउलट H1N1 अर्थात स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत तब्बल ३२९.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ७२ रुग्ण आढळले होते, तर यंदा ३०९ रुग्णांची नोंद झाली आहे.
कोविड-१९च्या रुग्णसंख्येतही ८१.४ टक्क्यांची घट झाली असून, गेल्या वर्षीच्या ६६८ रुग्णांच्या तुलनेत यंदा १२४ रुग्ण आढळले आहेत.


No comments:
Post a Comment