
मुंबई JPN NEWS - मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्याच्या गप्पा होत असताना घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील महिलांना मात्र मूलभूत शौचालय सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक शौचालये तुंबलेली आणि अस्वच्छ असल्याने महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, काही महिलांवर उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या समस्येबाबत स्थानिक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांची भेट घेऊन प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. शौचालयांमध्ये प्रचंड घाण आणि दुर्गंधी असून त्यांचा वापर करणेही कठीण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या समस्येबाबत १५ जून रोजी महापालिका प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. त्यावर १६ जून रोजी आवक नोंद झाली असतानाही जवळपास दोन महिने उलटून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ॲड. मातेले यांनी केला आहे.
“एकीकडे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणायचे आणि दुसरीकडे महिलांना शौचालयाची सुविधा मिळत नाही, ही महापालिका प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे,” असा घणाघात मातेले यांनी केला.
रामजीनगरमधील तुंबलेल्या सार्वजनिक शौचालयांची तातडीने साफसफाई व दुरुस्ती करावी, अन्यथा महिलांना सोबत घेऊन ‘एन’ विभाग कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment