
मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करण्याच्या निर्णयाविरोधात कामगार संघटना पुन्हा एकदा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता NPS लागू करण्यात आल्याचा आरोप करत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सर्व कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा उद्या, गुरुवार १ ऑक्टोबर रोजी दादर पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे.
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात दुपारी ३ वाजता हा मेळावा होणार आहे. महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पुढील आंदोलनाची दिशा या मेळाव्यात निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. रस्त्यावरची लढाई उभारण्याची तयारी कामगार संघटनांनी दर्शवली आहे.
महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारिका, परिसेविका, सुरक्षा रक्षक, शिक्षक यांच्यासह विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना NPS लागू करण्याच्या निर्णयामुळे नाराजी असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी पुरेशी चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचा आरोपही संघटनांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांना पूर्वी मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत संघटनांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या निधीतील मोठी रक्कम विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतविण्याच्या प्रस्तावावरही म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव आणि सरचिटणीस वामन कविस्कर यांनी आक्षेप घेतला आहे. अशा गुंतवणुकीमुळे भविष्यात संबंधित आर्थिक संस्थांना तोटा किंवा अन्य आर्थिक अडचणी निर्माण झाल्यास कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
“कामगारांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेशी तडजोड करता येणार नाही,” अशी भूमिका घेत NPS रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. आमदार आणि खासदारांना निवृत्तीवेतन मिळत असल्याचा संदर्भ देत महापालिका कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत भेदभाव का, असा सवालही संघटनांच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
या मेळाव्याला समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, अशोक जाधव, वामन कविस्कर, दिवाकर दळवी, रमाकांत बने, के. पी. नाईक, नवनाथ घाडगे, त्रिशिला कांबळे, गजुला, प्रकाश जाधव, यशवंत धुरी यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
महापालिका प्रशासन आणि सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्यातून NPS विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा काय ठरते, याकडे महापालिका कर्मचारी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment