महापालिकेच्या स्कूल डायरीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र वगळले; किशोरी पेडणेकर आक्रमक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2026

महापालिकेच्या स्कूल डायरीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र वगळले; किशोरी पेडणेकर आक्रमक


मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी वितरित करण्यात येणाऱ्या दैनंदिन पुस्तिकेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र वगळण्यात आल्याचा आरोप करत महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र पुस्तिकेतून का वगळले? यामागचे कारण काय?” असा थेट सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित आणि वंचित घटकांना शिक्षणाचा समान अधिकार मिळावा, यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा युगपुरुषाचे छायाचित्र विद्यार्थ्यांच्या दैनंदिन पुस्तिकेतून वगळले जाणे ही गंभीर बाब असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. या प्रकाराची तातडीने सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पेडणेकर यांनी ३० सप्टेंबर रोजी शिष्टमंडळासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे युगपुरुष आहेत. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या दैनंदिन पुस्तिकेत अशा महान व्यक्तिमत्त्वांचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. हा शिष्टाचार शिक्षण विभाग कसा काय विसरला?”

पुस्तिका पुन्हा छापण्याची मागणी - 
महापालिकेच्या दैनंदिन पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध माहिती, मूल्ये आणि सामाजिक विचारांची ओळख करून दिली जाते. त्यामुळे अशा पुस्तिकेची निर्मिती करताना मजकूर, छायाचित्रे आणि अन्य तपशीलांची काटेकोर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेली दैनंदिन पुस्तिका नव्याने छापण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या पुस्तिका रद्द करून दुरुस्ती केलेल्या पुस्तिका पुन्हा वितरित कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.

आयुक्तांची भेट घेणार - 
या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. तसेच भविष्यात महापुरुषांच्या संदर्भातील कोणतीही बाब दुर्लक्षित होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने स्पष्ट कार्यपद्धती आणि पडताळणीची व्यवस्था निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पेडणेकर यांनी या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी या मुद्द्यावर शिक्षण विभागाकडून स्पष्ट खुलासा आणि तातडीच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS