
मुंबई JPN NEWS - शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
महापालिका शाळांना केवळ आर्थिक मदत करण्याऐवजी तज्ज्ञांनी मार्गदर्शन, आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि चांगल्या शैक्षणिक पद्धती उपलब्ध करून द्याव्यात. नामांकित शाळांमधील शिक्षकांनी महिन्यातून एकदा महापालिका शाळांना भेट देऊन ज्ञानाची देवाणघेवाण करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासाला महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना लहान वयापासून कौशल्याधारित शिक्षण देणे आवश्यक असून, त्यातून आत्मविश्वासासोबत श्रमप्रतिष्ठेची भावना निर्माण होईल. शिक्षण हे केवळ परीक्षा, गुण आणि पदवीपुरते मर्यादित न राहता संस्कार, मूल्ये, संस्कृती आणि व्यावहारिक ज्ञानावरही आधारित असावे, असे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याने त्यानुसार शिक्षणपद्धतीतही बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
‘ड्रग-फ्री मुंबई’साठी शाळांनी पुढाकार घ्यावा -
विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेने दोन पालक, दोन शिक्षक आणि समाजसेवी संस्था अथवा समुपदेशकाचा समावेश असलेली समिती स्थापन करावी. पालक, शिक्षक आणि समुपदेशकांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करावी. ‘ड्रग-फ्री मुंबई’ हे शासनाचे अभियान न राहता सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे आवाहन लोढा यांनी केले.


No comments:
Post a Comment