
मुंबई JPN NEWS - बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक स्थितीत २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक अहवालानुसार, या वर्षात बेस्टची निव्वळ तूट ७३९.९७ कोटी रुपये राहिली आहे. मागील वर्षी ही तूट १,३६१.८५ कोटी रुपये होती. त्यामुळे यंदा बेस्टची तूट तब्बल ६२२ कोटी रुपयांनी म्हणजेच ४६ टक्क्यांनी कमी झाली आहे.
बेस्टच्या वाहतूक विभागाची तूट यंदा १,१८२.८७ कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या तुलनेत वाहतूक विभागाची तूट सुमारे ५४१ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. बसभाड्यातील बदल, तिकीट विक्रीत वाढ आणि इतर उत्पन्न वाढल्यामुळे ही तूट कमी झाल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.
भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात २३५.३० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. वाहतूक विभागाच्या इतर उत्पन्नातही ४८.५५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण प्रशासनाच्या खर्चात ३३.४५ कोटी रुपयांची घट झाली आहे.
बेस्टच्या विद्युत विभागाची शिल्लक ४४२.९० कोटी रुपये असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात २२.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्युत विभागाच्या खर्चातही २४४.३१ कोटी रुपयांची घट झाली आहे.
वीज खरेदीचा खर्च १६६.९२ कोटी रुपयांनी, तर कर्जावरील व्याजाचा खर्च १११.७८ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. प्रशासन आणि इतर खर्चातही घट झाल्याने विद्युत विभागाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.
दरम्यान, पूर्व कालावधीतील ३३१.७४ कोटी रुपयांची जमा शिल्लक आणि २०२५-२६ मधील तूट यांचे समायोजन केल्यानंतर ३१ मार्च २०२६ रोजी बेस्टची एकूण संचित तूट ६,५३४.७५ कोटी रुपये असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment