
मुंबई JPN NEWS - मुंबईतील प्रत्येक महानगरपालिका प्रभागात पुरेशा व विशेष प्रशिक्षित मनुष्यबळासह स्वतंत्र रेबीज क्लिनिक स्थापन करण्याचा मानस महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला. जागतिक रेबीज दिनानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आयोजित कार्यक्रमात ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प – दुसरा टप्पा’ सुरू करण्यात आला.
महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ तसेच माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. मुंबईत २०२५ मध्ये रेबीजमुळे एकही मृत्यू नोंदवला गेला नसल्याचे सांगत त्यांनी या कामगिरीचे कौतुक केले. २०२७ पर्यंत मुंबईला ‘Rabies-Controlled Area’ बनवणे आणि २०३० पर्यंत रेबीजमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे, हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक प्रभागातील प्रस्तावित रेबीज क्लिनिकमध्ये श्वानदंश झालेल्या नागरिकांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी आधुनिक रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा २४ तास उपलब्ध ठेवण्याची आवश्यकता महापौरांनी व्यक्त केली. तसेच प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र व समर्पित श्वान पकडणारे वाहन अद्ययावत पशुवैद्यकीय उपचार सुविधांसह उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.
रेबीज निर्मूलन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उद्दिष्टे -
दुसऱ्या टप्प्यात भटक्या श्वानांचे सातत्यपूर्ण लसीकरण, लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवणे, नियमित सर्वेक्षण तसेच श्वानदंशाच्या घटना वेळीच शोधून त्यावर उपचार करण्यावर भर दिला जाणार आहे.
आगामी तीन वर्षांत दरवर्षी सरासरी ५५ हजार ते ६० हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे.
रेबीज प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी ५ लाख विद्यार्थी आणि ५ हजार शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्येही जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असून, उपनगरीय लोकल रेल्वे स्थानकांच्या परिसरातही नागरिकांमध्ये रेबीजबाबत माहिती दिली जाणार आहे.
‘आपला दवाखाना’मध्ये लस आणि सीरम उपलब्ध करण्याचे निर्देश -
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी रेबीज निर्मूलनासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ येथे रेबीज प्रतिबंधक लस आणि सीरम उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. अजित शेवाळे यांनीही मुंबईने रेबीज निर्मूलनाच्या दिशेने मागील काही वर्षांत केलेल्या कामाचे कौतुक केले. २०३० चे उद्दिष्ट लक्षात घेऊन मुंबईच्या रेबीज निर्मूलन मोहिमेला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. अजित शेवाळे, उपायुक्त (विशेष) विनायक विसपुते, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहअधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले, डब्ल्यू.व्ही.एस. यूके मिशन रेबीजचे संचालक डॉ. अँडी गिब्सन, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण आणि उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment