
मुंबई JPN NEWS - विविध व्यक्तींच्या नावावर बँक खाती उघडून तसेच सिमकार्ड मिळवून त्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी करणाऱ्या सात जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने गोव्यातून अटक केली आहे. वार्का, गोवा येथील एका रिसॉर्टमधील व्हिलामधून १३ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेला ११ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ६१, ४५, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवून कक्ष ५ मार्फत तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान संबंधित आरोपी स्वतःच्या तसेच इतर साथीदारांच्या नावावर विविध बँकांमध्ये खाती उघडत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या खात्यांना जोडण्यासाठी विविध व्यक्तींच्या नावावर सिमकार्ड घेण्यात येत होती. बँक खाती उघडल्यानंतर पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड तसेच इतर संबंधित साधनांचा ताबा आरोपींकडे ठेवला जात होता. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम हाताळण्यासाठी केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात विविध बँकांची ८८ पासबुक, १४३ चेकबुक, १०० एटीएम कार्ड, २४ मोबाईल फोन, १६७ सिमकार्ड आणि २ लॅपटॉप जप्त करण्यात आले होते.
तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे पोलिसांनी गोव्यातील वार्का येथील रिसॉर्टमध्ये कारवाई केली. तेथून अटक केलेल्या सात आरोपींकडून ५९ मोबाईल फोन, १९ सिमकार्ड, ९ लॅपटॉप, ५१ एटीएम कार्ड आणि १२ पासबुक यासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
तपासात आरोपींनी आर्थिक फसवणुकीतून मिळालेली रक्कम हस्तांतरित करण्यासाठी स्वतःचे अॅप्लिकेशन तयार करून त्याचा वापर केल्याचेही समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबर २०२६पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणात सायबर फसवणुकीचे स्वरूप, संबंधित बँक खाती, सिमकार्ड आणि आर्थिक व्यवहारांची पुढील तपासणी सुरू आहे.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन आणि सहायक पोलीस आयुक्त (मध्य) सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी पोतदार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


No comments:
Post a Comment