
मुंबई JPN NEWS - दुकानांच्या आणि आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर सहज दिसतील अशा स्वरूपात मराठी नामफलक लावणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर मुंबई महापालिकेने कारवाईचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान एस. व्ही. रोड आणि एलजीएस रोड परिसरातील ९ हजार ७९८ दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मराठी पाट्या न लावलेल्या २९४ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिली.
मराठी नामफलकाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने मे महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी आणि विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यात शहरातील दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात ३६ हजारांहून अधिक आस्थापनांची तपासणी -
पहिल्या टप्प्यात मुंबईतील ३६ हजार ७७३ दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार १२४ आस्थापनांबाबत अहवाल तयार करण्यात आला असून, संबंधित आस्थापनांविरोधात न्यायालयीन कारवाई प्रस्तावित आहे.
मराठी नामफलक न लावणाऱ्या ६३८ दुकाने व आस्थापनांविरोधात महापालिकेने न्यायालयात दावे दाखल केले आहेत. यापैकी १४३ प्रकरणांमधील न्यायालयीन कारवाई अंतिम टप्प्यात आहे. तसेच प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी अर्ज केलेल्या १९० आस्थापनांच्या मालकांकडून १२ लाख २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मॉल, नामांकित आस्थापनांवरही लक्ष -
दुसऱ्या टप्प्यात शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना तसेच प्रमुख रस्त्यांवरील दुकाने महापालिकेच्या रडारवर आहेत. प्रवेशद्वारावर मराठी पाटी लावण्याच्या नियमाचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दीक्षा कारकर यांनी दिला आहे.
मराठी नामफलकाच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेची तपासणी आणि कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.


No comments:
Post a Comment