
मुंबई JPN NEWS - देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित तीन दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU)ने २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे. त्याआधी २६ आणि २७ सप्टेंबरला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने सलग पाच दिवस बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता होती. ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरू राहाव्यात यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २७ सप्टेंबर रोजी बँकांच्या शाखा, कार्यालये, ATM-linked branches तसेच Currency Chests कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या माहितीनुसार, ग्राहकांच्या अत्यावश्यक बँकिंग गरजा दीर्घकाळ प्रभावित होऊ नयेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
दरम्यान, प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचे आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनांकडून कर्मचारी संघटनांना करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक बँकिंग सेवा कोणत्याही व्यत्ययाविना सुरू राहाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
थोडक्यात -
२६ सप्टेंबर : शनिवारची नियमित बँक सुट्टी
२७ सप्टेंबर : रविवार असूनही सार्वजनिक क्षेत्रातील बँका व RRBs सुरू
२८ ते ३० सप्टेंबर : UFBUचा प्रस्तावित देशव्यापी बँक संप
ATM-linked branches आणि Currency Chests : २७ सप्टेंबरला कार्यरत राहणार


No comments:
Post a Comment