१४ फुटांपेक्षा उंच ३९ हजार झोपड्यांवर हातोडा; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची विशेष मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2026

१४ फुटांपेक्षा उंच ३९ हजार झोपड्यांवर हातोडा; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची विशेष मोहीम


मुंबई JPN NEWS - झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे. संबंधित रहिवाशांनी अनधिकृत बांधकामे स्वतःहून तातडीने हटवावीत, अन्यथा महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

बृहन्मुंबई क्षेत्रात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या आहेत. यामध्ये मुंबई शहरातील ३ हजार ३४८, पश्चिम उपनगरांतील ४ हजार ५३६ आणि पूर्व उपनगरांतील तब्बल ३१ हजार २२७ झोपड्यांचा समावेश आहे.

यापैकी ४ हजार ५८४ झोपड्यांवर यापूर्वीच निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे, तर ६११ झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित अनधिकृत बांधकामांबाबत आता विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली जाणार आहे.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी तीन महिन्यांची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. आणखी १४० अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने नागरिकांना अनधिकृत बांधकामे करू नयेत, तसेच यापूर्वी अनधिकृत बांधकाम केले असल्यास ते स्वतःहून तातडीने हटवावे, असे आवाहन केले आहे. अन्यथा संबंधित बांधकामांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS