
मुंबई JPN NEWS - अभियंता संवर्गासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन बदली प्रक्रियेला कोणत्याही कारणास्तव स्थगिती देऊ नये आणि ठरलेल्या धोरणानुसार तिची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेच्या अभियंता संवर्गातील बदल्यांसंदर्भात २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया ५ ते २० सप्टेंबरदरम्यान संगणकीय पद्धतीने पार पडली. त्यामुळे बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत झाल्याचा दावा युनियनने केला आहे.
मात्र, या पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रियेत बदल करण्यासाठी किंवा ती थांबविण्यासाठी काही स्तरावर प्रयत्न होत असल्याचा दावा दि म्युनिसिपल युनियनने आपल्या निवेदनातून केला आहे. ‘गाभा अभियंता धोरणा’च्या नावाखाली ऑनलाइन बदली प्रक्रियेत कोणताही बदल करू नये, अशी मागणी युनियनने आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान काही अभियंत्यांच्या सध्याच्या विभागाची माहिती अद्ययावत नसल्याने किरकोळ स्वरूपाची माहितीविषयक त्रुटी निर्माण झाल्याचेही युनियनने निदर्शनास आणून दिले आहे. प्रत्यक्ष बदली आदेश काढण्यापूर्वी संबंधित अभियंत्यांची सध्याची नियुक्ती व विभागाची माहिती दुरुस्त करून अद्ययावत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ आवश्यक डेटा दुरुस्ती करून नियमानुसार बदल्या करण्यात याव्यात आणि प्रक्रियेला स्थगिती देऊ नये, अशी भूमिका दि म्युनिसिपल युनियनने घेतली आहे.


No comments:
Post a Comment