
मुंबई JPN NEWS - गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन मशीद आणि माटुंगा परिसरातील चार पादचारी पूल बंद करण्यात येणार आहेत. या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट IIT मुंबईकडून करण्यात आले असून, चारही पूल संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
मशीद येथील भंडारी पादचारी पूल आणि मशीद स्थानक पादचारी पूल, तसेच माटुंगा येथील भाऊ दाजी रोडवरील लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल आणि गुरु नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल बंद करण्यात येणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी या पुलांची संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर IIT मुंबईने ३१ ऑगस्ट रोजी चारही पुलांचे स्वतंत्र संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केले.
या तपासणीत पुलांच्या महत्त्वाच्या संरचनात्मक भागांची झीज झाल्याचे तसेच गंज लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे पूल पादचाऱ्यांच्या वापरासाठी तातडीने बंद करून त्यांचे विघटन आणि पुनर्बांधणी करण्याचा विचार करावा, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
गणेशोत्सवादरम्यान रेल्वे स्थानकांवर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या पुलांचा वापर सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे पूल बंद करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
मध्य रेल्वेने प्रवासी आणि नागरिकांना बंद करण्यात येणाऱ्या पादचारी पुलांचा वापर न करण्याचे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


No comments:
Post a Comment