भांडूपमध्ये १.१८ कोटींचा प्रतिबंधित गुटखा-सुगंधित सुपारीचा साठा जप्त - JPN NEWS 2.

Post Top Ad

भांडूपमध्ये १.१८ कोटींचा प्रतिबंधित गुटखा-सुगंधित सुपारीचा साठा जप्त

Share This

मुंबई JPN NEWS - प्रतिबंधित गुटखा, सुगंधित सुपारी आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात भांडूप पोलिसांनी मोठी कारवाई केली. नाहूर येथील महानगरपालिका पार्किंग परिसरात १२ सप्टेंबर रोजी पहाटे पोलिसांनी सापळा रचून २० लाख २१ हजार १०० रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त केला. तसेच या मालाची वाहतूक करणारी सुमारे ९८ लाख रुपये किमतीची पाच वाहने ताब्यात घेतली.

या कारवाईत एक कंटेनर, दोन टेम्पो, एक बोलेरो आणि एक पिकअप अशी पाच वाहने पोलिसांच्या ताब्यात आली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये वरानसी आशिक सुगंधित सुपारी आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.

भांडूप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षिरसागर यांना प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारीच्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली.

व्हिलेज रोड, नाहूर येथील महानगरपालिका पार्किंग परिसरात पहाटे ४.२५ वाजण्याच्या सुमारास संशयित वाहने दाखल होताच पोलिसांनी त्यांना अडवून तपासणी केली. त्यावेळी प्रतिबंधित मालाचा साठा उघडकीस आला.

या कारवाईत प्रतिबंधित माल आणि वाहनांसह एकूण १ कोटी १८ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जप्त केलेला माल कुठून आणण्यात आला आणि त्याचा पुढील पुरवठा कुठे करण्यात येणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, पोलीस हवालदार हिरालाल चरांडे, मुकेश तिरमारे, गणेश सोनवणे तसेच पोलीस शिपाई विकास शिंदे आणि विजयकुमार पवार यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS JPN NEWS

Pages