लंडनच्या संसदेत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवाचा जागर, भारतासह विविध देशांतील मान्यवरांची उपस्थिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2026

लंडनच्या संसदेत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवाचा जागर, भारतासह विविध देशांतील मान्यवरांची उपस्थिती


मुंबई JPN NEWS - भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानाच्या अमृतमहोत्सवाचा जागर प्रथमच लंडन येथील संसदेत करण्यात येणार आहे. बीबीएमजी फाउंडेशन, लंडन यूके आणि बोधिसत्व फाउंडेशन, मुंबई भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे आणि बीबीएमजी फाउंडेशन, लंडनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव हंस यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्यासोबतच सामाजिक समानता, लोकशाही मूल्ये, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि भारत-यूके संबंध अधिक दृढ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारतासह जपान, कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि यूकेमधील मंत्री, खासदार, राजदूत, उद्योगपती व विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, त्यांचे सामाजिक आंदोलन, विचार, वारसा, दूरदृष्टी आणि ग्रंथसंपदा यावर आधारित विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. लंडन आणि लीसेस्टर येथे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विशेष नाट्यमय सादरीकरणही करण्यात येणार आहे.

इंडो-यूके फ्री ट्रेड समिट - 
कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लंडनच्या संसदेत ‘इंडो-यूके फ्री ट्रेड समिट – Chapter 10’ आयोजित करण्यात येणार आहे. भारत आणि यूकेमधील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी या परिषदेत दोन्ही देशांतील उद्योगपती, उद्योजक आणि संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी भारतातून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यूकेमधून माजी पंतप्रधान ऋषी सुनक, खासदार वीरेंद्र शर्मा, खासदार रामी रेंजर, माजी महापौर सुनील चोप्रा, उद्योग क्षेत्रातील विजय गांधी, खासदार बॉब ब्लॅकमॅन, खासदार गॅरेथ थॉमस आदी मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच थायलंडचे माजी पंतप्रधान प्रवित वोन्सुवोन, सौरक्षण मंत्री आडूल बून्थम्चरोएन आणि श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनाही निमंत्रित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

भारतीय संविधानाची मूल्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भारत-यूकेमधील सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंधांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे, हा या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. गौरव हंस आणि अविनाश कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS