खारमध्ये गणेश विसर्जनावेळी महिलेची बॅग चोरी; २४ तासांत आरोपीला अटक, ३.६६ लाखांचा ऐवज हस्तगत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2026

खारमध्ये गणेश विसर्जनावेळी महिलेची बॅग चोरी; २४ तासांत आरोपीला अटक, ३.६६ लाखांचा ऐवज हस्तगत


मुंबई JPN NEWS - गणेश विसर्जनासाठी खारदांडा जेट्टी परिसरात गेलेल्या महिलेची रिक्षातून बॅग चोरी करणाऱ्या आरोपीला खार पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपीकडून चोरीला गेलेला सुमारे ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा १०० टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मानसी महेंद्र चिले (४३), रा. विरार पूर्व, पालघर या १९ सप्टेंबर रोजी नातेवाईकांसह गणेश विसर्जनासाठी खारदांडा जेट्टी येथे गेल्या होत्या. विसर्जनासाठी जाताना त्यांनी आपली बॅग रिक्षामध्ये ठेवली होती. विसर्जन आटोपून रिक्षाजवळ परतल्यानंतर बॅग आढळून आली नाही.

चिले यांनी परिसरात तसेच रिक्षाचालकाकडे चौकशी करून बॅगेचा शोध घेतला. मात्र, बॅग न मिळाल्याने त्यांनी खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चोरीला गेलेल्या बॅगेमध्ये सुमारे ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, किंमत अंदाजे ३ लाख ६० हजार रुपये, २ हजार ५०० रुपये रोख आणि सुमारे ४ हजार रुपयांचे कपडे, असा एकूण ३ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.

या प्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.

या तपासातून शैलेंद्रकुमार दीनानाथ कश्यप (३३), रा. खारदांडा, खार पश्चिम याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दाखल अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ असून, तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी केला.

गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कुंभारे, पोलीस उपनिरीक्षक चौधरी तसेच पोलीस हवालदार कांबळे, निकम आणि पोलीस शिपाई सावंत, लहामागे, कांबळे, कदम, खेडकर आणि चव्हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS