चेंबूर कॅम्पमध्ये बिअर न दिल्याने चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; गोरेगावात रेशन दुकानदाराला सिलिंडरने मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2026

चेंबूर कॅम्पमध्ये बिअर न दिल्याने चाकूने हल्ल्याचा प्रयत्न; गोरेगावात रेशन दुकानदाराला सिलिंडरने मारहाण


मुंबई JPN NEWS - किरकोळ कारणांवरून झालेल्या वादातून मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चेंबूर कॅम्पमध्ये बिअर देण्यास नकार दिल्याने एका ३३ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला, तर गोरेगाव पूर्व येथे सामानाचे वजन मोजण्याच्या कारणावरून रेशन दुकानदारावर पाच जणांनी हल्ला केला. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींवर कारवाई केली आहे.

चेंबूर कॅम्पमध्ये बिअर न दिल्याने चाकूने हल्ला - 
आर.सी.एफ. पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत बाळू आव्हाड (३३) हे चेंबूर कॅम्प येथील एम.एस. बिल्डिंग परिसरात मित्रासोबत थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आला आणि त्याने आव्हाड यांच्याकडे बिअरची मागणी केली.

आव्हाड यांनी बिअर देण्यास नकार दिल्याने आरोपीने चाकू काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर त्याने आव्हाड यांच्या दिशेने धाव घेत मानेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार अडवताना चाकू आव्हाड यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी आर.सी.एफ. पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी गुन्हा क्रमांक ५६६/२०२६ दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, धमकीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोरेगावात रेशन दुकानदारावर पाच जणांचा हल्ला - 
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ सप्टेंबर रोजी रात्री संतोषनगर परिसरात दुसरी घटना घडली. संजय हंसराज मौर्या (३४) हे आपले रेशन दुकान बंद करण्यासाठी गेले असताना सामानाचे वजन मोजण्याच्या कारणावरून पाच जणांशी त्यांचा वाद झाला.

त्यानंतर आरोपींनी कथितरित्या बेकायदेशीर जमाव करून मौर्या यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एका आरोपीने दुकानाबाहेरील लाल रंगाचा लोखंडी सिलिंडर उचलून मौर्या यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. तर अन्य एका आरोपीने शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात मौर्या गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी गुन्हा क्रमांक १००४/२०२६ दाखल केला असून पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS