
मुंबई JPN NEWS - टॅक्सीतून उतरत असताना कंत्राटी बेस्ट बसची धडक बसल्याने ६० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वरळी परिसरात घडली. वनमाला साबळे असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात वरळीतील एसटी कार्यालय परिसरातील मुख्य वाहतूक सिग्नलजवळ सकाळी सुमारे ११.२५ वाजता घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वनमाला साबळे या काळ्या-पिवळ्या टॅक्सीतून प्रवास करत होत्या. सिग्नलवर वाहने थांबलेली असताना त्या टॅक्सीतून खाली उतरत होत्या. त्याचवेळी सिग्नल हिरवा झाल्यानंतर शेजारी उभी असलेली बेस्ट बस पुढे निघाली. यावेळी बसची साबळे यांना धडक बसली आणि त्या रस्त्यावर पडल्या. त्यानंतर बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर बसमधील वाहक आणि प्रवाशांनी तातडीने मदत करत जखमी महिलेला नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अपघातग्रस्त बस मुंबई सेंट्रल आगाराअंतर्गत कंत्राटी पद्धतीने चालवली जात होती. ए-१५४ मार्गावरील बस क्रमांक ७१६१ भायखळा स्थानकातून नेहरू तारांगणच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दादरमध्ये बेस्ट बसचालकाला मारहाण -
दरम्यान, दादर टिळक पुलाजवळ बेस्ट बसचालकाला खासगी कारचालकाने मारहाण केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. रस्ता न दिल्याच्या कारणावरून कारचालकाने बसचालकाशी वाद घालत मारहाण केल्याची माहिती आहे. उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी संबंधित कारचालकाविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
मुंबईतील बेस्ट बसशी संबंधित अपघात आणि चालकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


No comments:
Post a Comment