
मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांना सुरक्षित आणि निर्भय वातावरणात उत्सव साजरा करता यावा, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. उत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या सुरक्षेसाठी ७ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३७ पोलीस उपायुक्त आणि ५२ सहायक पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय २,६५० पोलीस अधिकारी आणि १४,१५० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.
संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त -
शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), दंगल नियंत्रण पथके (Riot Control Teams) आणि होमगार्ड्स यांचा समावेश आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वतंत्र सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुका, विसर्जन स्थळे आणि गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे.
संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना माहिती द्या -
गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी संयम बाळगावा आणि सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. कोणतीही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास तिला हात न लावता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तातडीच्या पोलीस मदतीसाठी नागरिकांनी १०० किंवा ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहात पार पडावा यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment