
मुंबई JPN NEWS - ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना गणेशोत्सवाच्या काळात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली असून, पुढील दोन आठवड्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान राज्यात पाऊस सक्रिय राहणार असून काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहू शकतो.
राज्यात सर्वदूर एकसारखा पाऊस पडण्याऐवजी काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी उघडीप असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेस उन्हाचा कडाका जाणवू शकतो, तर दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
२० ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाढण्याची शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे. नांदेड, लातूर, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात आणि गणेश विसर्जनाच्या काळातही पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच यंदा परतीचा पाऊस चांगला होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसामुळे खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र हा हवामान अभ्यासकाने व्यक्त केलेला अंदाज असून, प्रत्यक्ष पावसाची स्थिती स्थानिक हवामान परिस्थितीनुसार बदलू शकते.


No comments:
Post a Comment