
मुंबई JPN NEWS - सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशभक्त आणि पर्यटकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने जादा बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रात्रीच्या वेळेत विविध मार्गांवर अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक शहरात येतात. विशेषतः गौरी-गणपती विसर्जनानंतर विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी गर्दी होते.
दिवसा बेस्टच्या नियमित बसगाड्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्या तरी रात्रीच्या वेळेत बससेवा तुलनेने कमी असते. त्यामुळे गणेशोत्सवातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन बेस्टने रात्रीच्या प्रवर्तनात वाढ करण्याचे नियोजन केले आहे.
कुलाबा ते उत्तर-पश्चिम मुंबईदरम्यान अतिरिक्त बससेवा -
या कालावधीत कुलाबा परिसरातून गिरगाव, लालबाग, परळ, दादरमार्गे उत्तर-पश्चिम मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विविध बसमार्गांवर जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये ए-४, ए-८, ए-२१, ए-२५, ए-४२, ए-४४, ५१, ६४, ६६ आणि ६९ या बसमार्गांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांना भेट देणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, तसेच गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही अतिरिक्त बससेवा महत्त्वाची ठरणार आहे. गणेशभक्त आणि पर्यटकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment