
मुंबई JPN NEWS - सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेशी ओळख निर्माण करून तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी उकळल्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला पंजाबमधून अटक केली आहे. आरोपीने पीडित महिलेच्या आणखी मागण्या मान्य न केल्याने तिचा व्हिडीओ नातेवाईकांसह इतर व्यक्तींना पाठवल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.
मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपीने स्नॅपचॅट आणि अन्य सोशल मीडिया माध्यमातून पीडितेशी संपर्क साधला. त्यानंतर तिच्याशी ओळख निर्माण करून तिचे फोटो व व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे तिच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.
दरम्यान, आरोपीच्या आणखी मागण्या पीडितेने मान्य न केल्याने त्याने तिचा व्हिडीओ तिच्या नातेवाईकांसह इतर व्यक्तींना पाठविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा क्रमांक ९२४/२०२६ दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३०८(२), ३५१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(ई), ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास पथक तयार केले. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सतनाम मनदिप सिंग (२२) याला पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथून अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अनोळखी सोशल मीडिया अकाउंटपासून सावध राहण्याचे आवाहन -
अनोळखी सोशल मीडिया अकाउंटवरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट, मेसेज तसेच व्हिडीओ कॉल स्वीकारताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. अश्लील फोटो किंवा व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी झाल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


No comments:
Post a Comment