
भिवंडी JPN NEWS - मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या धर्तीवर दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही समान वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत भिवंडी येथील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) काळी फित लावून निषेध नोंदविला.
दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करून समान कामासाठी समान वेतन लागू करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे विविध निवेदने, मागणीपत्रे आणि विनंत्यांद्वारे सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या मागणीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये राज्य शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
राज्यातील विविध न्यायालयीन कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात भिवंडी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधले.
न्यायालयीन व्यवस्थेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करून समान कामासाठी समान वेतन या मागणीवर शासनाने गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात भिवंडी न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


No comments:
Post a Comment