मुंबई JPN NEWS - मुंबईतील रस्ते आणि पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महापालिकेने कारवाई तीव्र केली असून, घाटकोपर आणि शिवडी परिसरात एकूण ५० बांधकामे, अनधिकृत दुकाने आणि तात्पुरते शेड हटविण्यात आले. यामध्ये घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या मार्गातील २८ बाधित बांधकामांवर, तर शिवडीत पदपथांवरील ७ अनधिकृत दुकाने आणि १५ तात्पुरत्या शेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. याशिवाय शिवडीत २ अनधिकृत कट्टे, ४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.
घाटकोपरमध्ये २८ बाधित बांधकामांवर कारवाई -
घाटकोपर (पश्चिम) परिसरात झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या २८ बांधकामांवर ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या एन विभागाकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावित मार्गातील बाधित बांधकामे हटविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
शिवडीत ७ दुकाने, १५ शेडसह अतिक्रमणांवर कारवाई -
दरम्यान, ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत ८ ऑक्टोबर रोजी शिवडी परिसरातील डी. जी. महाजनी आणि जेरबाई वाडिया मार्गालगतच्या पदपथांवर महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाने कारवाई केली.
या कारवाईत ७ अनधिकृत दुकाने आणि १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, अशी एकूण २२ ठिकाणे हटविण्यात आली. त्याचबरोबर २ अनधिकृत कट्टे, ४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पदपथ अडवणाऱ्यांना महापालिकेचा इशारा -
पादचाऱ्यांना अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. पदपथांवर अनधिकृत बांधकाम करून अडथळा निर्माण करू नये किंवा तेथे साहित्य ठेवू नये. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.



No comments:
Post a Comment