
मुंबई JPN NEWS - मुंबईत मलेरिया, डेंगी आदी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच नागरिकांना उपलब्ध असलेल्या आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. (Mumbai News, Bmc News)
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी (८ ऑक्टोबर) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या आरोग्य संस्थांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रभादेवी येथील हाजी मोहम्मद साबू सिद्दीकी महानगरपालिका प्रसूतीगृह तसेच महानगरपालिका दवाखाना आणि पॉलीक्लिनिकला भेट देत त्यांनी तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
प्रसूतीगृहाच्या पाहणीदरम्यान आयुक्तांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तेथील दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. तसेच एचएमआयएस प्रणालीअंतर्गत बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागातील नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली. प्रसूतीगृहाच्या इमारतीतील आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर प्रभादेवी येथील महानगरपालिका दवाखाना आणि पॉलीक्लिनिकची पाहणी करताना तेथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवांचा आयुक्तांनी आढावा घेतला. दवाखान्यातील दैनंदिन रुग्णसंख्या, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रकार, औषधांचा उपलब्ध साठा आणि रक्त तपासणीची सुविधा याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
दरम्यान, ‘जी दक्षिण’ विभागातील मलेरिया आणि डेंगीच्या रुग्णसंख्येची माहिती जाणून घेत आयुक्तांनी या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. परिसरातील आरोग्य परिस्थितीवर नियमित लक्ष ठेवण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यावर त्यांनी भर दिला.
नागरिकांना आरोग्यविषयक शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठीही आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य स्वयंसेविकांच्या माध्यमातून जनजागृती वाढवावी, असे त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी उप आयुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी दक्षिण) स्वप्नजा क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment