
मुंबई JPN NEWS - राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) कार्यरत असलेल्या मुंबई महापालिकेच्या १,७०० हून अधिक बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांमधील महिलांना १८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा लागू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी बाह्यस्रोत आरोग्य कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी महापौर तावडे यांनी पुढाकार घेतला होता. ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर महापौरांनी महापालिका प्रशासनाला पत्र लिहून प्रलंबित मागण्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
प्रशासनाकडून कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बुधवारी (१४ ऑक्टोबर) आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर निवासस्थानी रितू तावडे यांची भेट घेतली. या बैठकीत महापौरांनी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती शिष्टमंडळाला दिली.
किमान वेतनाच्या प्रस्तावावर कार्यवाही -
बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्याच्या मागणीवरही महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रमुख कामगार अधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह वित्त विभागाकडे सादर करण्यात येत आहे. त्यामुळे या मागणीवरील पुढील निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वेतन विलंबप्रकरणी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई -
कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार एजन्सी मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. यापुढे वेतनातील अनियमितता आणि कर्मचाऱ्यांच्या इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. तक्रारींची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचेही नियोजन आहे.
कोविड काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर भर -
कोविड-१९ संसर्गाच्या काळात मुंबईकरांना आरोग्यसेवा पुरवण्यात बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी महापौरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, कोविड काळात मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महापालिका खंबीरपणे उभी आहे. महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा मंजूर होणे हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. किमान वेतनासह इतर मागण्यांबाबतही प्रशासन आणि शासन सकारात्मक असून, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment