
मुंबई JPN NEWS - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी दाखल होतात. या अनुयायांच्या प्रवासाची सोय व्हावी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी हाताळता यावी, यासाठी मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूरदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून अनुयायी नागपूरला येतात. त्यामुळे या काळात रेल्वे प्रवासासाठी मोठी गर्दी होते.
मुंबई–नागपूर विशेष रेल्वेचे वेळापत्रक -
१. गाडी क्रमांक 01219 आणि 01220
मुंबई CSMT ते नागपूरदरम्यान गाडी क्रमांक 01219 ही विशेष रेल्वे १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई CSMT येथून सुटेल आणि १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01220 ही विशेष रेल्वे १९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता नागपूरहून सुटेल आणि २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 01019 आणि 01020 -
गाडी क्रमांक 01019 ही विशेष रेल्वे १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई CSMT येथून सुटेल. ही गाडी अनुक्रमे २० आणि २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
परतीसाठी गाडी क्रमांक 01020 ही विशेष रेल्वे २० आणि २२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता नागपूरहून सुटेल. ही गाडी अनुक्रमे २१ आणि २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
या स्थानकांवर थांबे -
या विशेष रेल्वेगाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, चाळीसगाव जंक्शन, पाचोरा जंक्शन, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन, बडनेरा जंक्शन, धामणगाव, पुलगाव, वर्धा जंक्शन आणि अजनी या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.
या विशेष रेल्वेसेवेमुळे मुंबई आणि मार्गावरील विविध शहरांमधून नागपूरला जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांना प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी मध्य रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवरून वेळापत्रक आणि आरक्षणाची उपलब्धता तपासावी.


No comments:
Post a Comment