Mumbai रविवारी Central Railwayवर Mega Block; पश्चिम रेल्वेवर रात्री जम्बो ब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2026

Mumbai रविवारी Central Railwayवर Mega Block; पश्चिम रेल्वेवर रात्री जम्बो ब्लॉक


मुंबई JPN NEWS - रेल्वे मार्गांची देखभाल, दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी दिवसा ब्लॉक नसणार असून, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे काही लोकलच्या वेळापत्रकात बदल होणार असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान ब्लॉक - 
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा स्थानकापासून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान नियोजित स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकावर पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. माटुंगा स्थानकावर या लोकल पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.

खोपोली येथून सीएसएमटीकडे जाणारी दुपारी १.४८ वाजताची लोकल पुनर्नियोजित करण्यात आली असून, ती दुपारी २.०६ वाजता सुटेल.

हार्बर मार्गावरील सेवा काही काळ बंद - 
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या कालावधीत सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत सुटणाऱ्या डाउन हार्बर लोकल सेवा निलंबित राहतील. तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत सुटणाऱ्या अप हार्बर लोकल सेवाही बंद राहतील.

प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळमार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक -
पश्चिम रेल्वेवर रविवार, २५ ऑक्टोबर रोजी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, शनिवार, २४ ऑक्टोबर आणि रविवार, २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.

या कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगावदरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही उपनगरीय लोकल रद्द राहणार आहेत. रद्द होणाऱ्या लोकलची सविस्तर माहिती संबंधित स्थानकांच्या स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध असेल.

रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी ब्लॉकचे वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS