देशात अराजकता पसरवणाऱ्या प्रवृत्तींचीही स्वच्छता गरजेची - मंगलप्रभात लोढा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2026

देशात अराजकता पसरवणाऱ्या प्रवृत्तींचीही स्वच्छता गरजेची - मंगलप्रभात लोढा


मुंबई JPN NEWS - स्वच्छता ही केवळ परिसरापुरती मर्यादित नसून समाज आणि देशात अराजकता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचीही स्वच्छता होणे आवश्यक असल्याचे मत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त गावदेवी येथील मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लोढा यांनी विरोधकांच्या आंदोलनावरही टीका केली. शिवाजी पार्क येथे आंदोलनाच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. झारखंडमधील पेपरफुटीच्या प्रकरणातील आंदोलनाचा संदर्भ देत संबंधित प्रवृत्तींची आंदोलने विशिष्ट शहरांपुरतीच मर्यादित असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे हित बाजूला ठेवून विरोधक राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोढा म्हणाले की, परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ एका व्यक्तीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एक दिवसाची मोहीम नसून ती सातत्याने पार पाडण्याची सामूहिक जबाबदारी आहे.

मणिभवनमधील ऐतिहासिक वस्तूंची पाहणी - 
स्वच्छता अभियानापूर्वी लोढा यांनी मणिभवन येथे महात्मा गांधी वास्तव्यास असलेल्या खोलीची तसेच गांधीजींचा चरखा, टेलिफोन आणि इतर ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. खादी कापडाच्या प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. यानंतर मणिभवनसमोरील रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई’ या संदेशातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त उपस्थितांनी गांधीजींच्या आवडत्या ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाचे सामूहिक गायन केले. या अभियानात मुंबई महापालिकेच्या डी विभागातील अधिकारी, सफाई कर्मचारी तसेच मणिभवनचे कर्मचारी सहभागी झाले होते.

‘देशात अराजकता पसरवली जात आहे’ - 
विरोधी पक्षांनी सरकारच्या विविध निर्णयांना विरोध करणे हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगत, मात्र देशात अराजकता निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती संविधान मानणाऱ्या नागरिकांसमोर आव्हान निर्माण करत असल्याचा आरोप लोढा यांनी केला. अशा प्रवृत्तींना परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मदत मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS